चाळीसगावात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची संयुक्त बैठक

चाळीसगावात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची संयुक्त बैठक
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील नवरात्र उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
ही बैठक अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बैठकीत शासनाकडून आलेले परिपत्रक व नियमावली मंडळ पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्यात आली. तसेच उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वेळेचे पालन, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक शिस्त याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी शहर पोलीस स्टेशन तसेच मेहुनबारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने सहकार्याचे आवाहन करत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सजग राहावे असेही आवाहन केले.






