अमळनेरमध्ये भक्तिमय वातावरणात कानबाईला निरोप

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । श्रावण महिन्याच्या आगमनासोबतच खान्देशातील घराघरांत उत्साहाने साजरा होणारा कानबाई माता उत्सव यंदा अमळनेर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या भक्तिभावाने पार पडला. २ ते ४ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय उत्सवात धार्मिक विधी, पारंपरिक परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
शनिवारी (२ ऑगस्ट) उत्सवाची सुरुवात घराघरात रोट पूजन आणि पारंपरिक पद्धतीने मातेची ओटी भरून झाली. यावर्षी अमळगाव येथील महाले कुटुंबाने तब्बल ३० वर्षांनंतर कानबाईची स्थापना केली. अनेक वर्षांपासून काही कारणांमुळे पूजन थांबले होते, पण यंदा संधी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे आणि भावूक वातावरण होते.
रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी मातेची मूर्ती विधिवत स्थापित करून महाआरती करण्यात आली. या उत्सवासाठी शहराबाहेरून अनेक चाकरमानी आपल्या गावी परतल्यामुळे उत्सवाला एक वेगळाच रंगत आली. यामुळे गावातील वातावरण अधिकच चैतन्यमय आणि भक्तिमय झाले होते.
या उत्सवातील एक हृदयस्पर्शी घटना म्हणजे पाहुनिन परंपरा जपली गेल्याचे पाहायला मिळाले. बहादुरपूर येथील मूळ पूजक कुटुंबात सुतक असल्यामुळे, देवीला ‘पाहुनिन’ म्हणून अमळगावातील सौ. ललिताबाई आणि बहादूर चौधरी यांच्या घरी पूजेसाठी नेण्यात आले. खान्देशातील ही अनोखी परंपरा दर्शवते की, अडचणी आल्या तरी श्रद्धेमध्ये कोणतीही बाधा येत नाही आणि गावकरी एकत्र येऊन परंपरा जपतात.
सोमवारी (४ ऑगस्ट) उत्सवाचा शेवट कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीने झाला. ही मिरवणूक डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात, महिलांच्या ओवाळण्यांसह आणि युवकांच्या घोषणांनी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत हरिहरा ह.भ.प. दादू भगत महाराज यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यावर्षी पाऊस कमी असला तरी, नदीच्या ठिकाणी मातेचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्व गावकऱ्यांनी “यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, शेतीत बहर येऊ दे आणि अन्नदात्यांचे जीवन सुखी होवो” अशी सामूहिक प्रार्थना केली.
हा उत्सव केवळ अमळनेर शहरातच नाही, तर अमळगाव, मेहरगाव, निंभोरा, कलाली, दोधवद, हिंगोणे, जळोद, पिंगळवाडे, गांधली, पिळोदे, पिंपळी, खवशी यांसारख्या अनेक गावांमध्येही मोठ्या श्रद्धेने साजरा झाला. कानबाई माता उत्सव हा खान्देशातील घराघरातील आस्था, नातेसंबंध आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनून राहिला आहे.