४१ तासांची मेहनत, घाटात फेऱ्या मारल्यावर एलसीबीला गवसले खुनातील संशयीत
महा पोलीस न्यूज | १४ फेब्रुवारी २०२४ | चाळीसगाव शहरात दि.७ फेब्रुवारी रोजी भर दुपारी माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. सहा दिवस उलटून देखील आरोपी हाती लागत नसल्याने पोलीस दलाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे देखील विचारात पडले होते अखेर जळगाव एलसीबीच्या पथकाने दोघांना जाळ्यात अडकवले. तब्बल ४१ तासांची मेहनत, कसारा घाट, रायगड, पुणे अशा फेऱ्या मारून गुप्त माहितीच्या आधारे दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली.
चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दि.७ रोजी गोळीबार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून १) उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), २) सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), ३) अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), ४) सॅम चव्हाण (रा. हिरापुर), ५) भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव) ६) सुमित भोसले (रा. चाळीसगाव) ७) संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असेही फिर्यादीत नमूद होते.
उपचारादरम्यान बाळू मोरे यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले होते. गुन्ह्यानंतर चाळीसगावात तणावाची स्थिती होती तर आरोपी देखील फरार झाले होते. सहा दिवस होऊन देखील आरोपी सापडत नसल्याने पोलीस देखील त्रस्त झाले होते. संशयितांची नावे माहिती असून देखील ते हाती लागत नसल्याने अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि.११ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, सचिन सोमनाथ गायकवाड रा.घाटरोड आणि अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेले आहेत. एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. चाळीसगाव सोडल्यानंतर चारचाकीने खरजाई नाका, पातोंडा मार्गे वाघडू गाव गाठले. तिथून पुढे औट्रामच्या घाटात चारचाकी सोडून सर्वांनी वेगळा मार्ग निवडला. सचिन आणि अनिस हे दोघे रायगड, पुणे असा चोर पोलिसाचा खेळ खेळू लगले.
एलसीबीचे पथक दोघांच्या मागावर सलग ४१ तास होते. रायगड, कसारा घाट, पुणे असा खेळ सुरु होता. केवळ जेवणासाठी रात्री २ वाजता वाहन एखाद्या ढाब्यावर थांबत होते, झोप तर नशिबातच नव्हती. आरोपींना घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही असा प्रण घेतलेल्या पथकाने अंतर्वस्त्र देखील नवीन खरेदी केले आणि मळक्या कपड्यांनी पुणे लोणीकंद परिसर पिंजून काढून शिताफिने दोघांना ताब्यात घेतले. पोलीस कारवाई करतांना तपासात हवालदार अक्रम शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले. जळगावात आल्यानंतर देखील पथकाने दोघांवर दिवसभर पाळत ठेवत त्यांची चौकशी केली आणि पुढील तपासकामी चाळीसगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात दिले.