जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल, ८ पोलीस अंमलदारांची एकाच शाखेत बदली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था तसेच सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस दलातील आठ पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या सर्व अंमलदारांची नेमणूक जळगाव येथील सायबर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय बाबी, कायदा व सुव्यवस्था आणि सायबर पोलीस स्टेशनचे कामकाज विचारात घेऊन, आस्थापना मंडळाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक पोलीस हेड कॉन्स्टेबल, दोन महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, एक महिला पोलीस नाईक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल नाईक यांचा समावेश आहे.
नेमणूक करण्यात आलेल्या अंमलदारांची यादी
खालील पोलीस अंमलदारांची त्यांच्या सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणाहून सायबर पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. त्यात पोहेकॉ राजेंद्र गुरमल राठोड, शवाशा जळगाव, मपोहेकॉ निता सुभाषसिंग राजपूत स्थागुशा जळगाव, मपोना सारीका रविंद्र वाणी यावल पोस्टे, पोकॉ निखिल मुकुंदा नारखेडे पो मु जळगाव, पोकॉ विनोद दुर्गालाल चौधरी यावल पोस्टे, पोना कल्पेश मुरलीधर आमोदकर रावेर पोस्टे, पोकॉ मुकेश पांडुरंग लोकरे पिंपळगाव हरे, पोकॉ भुषण अशोक माळी वरणगाव पोस्टे यांचा समावेश आहे.
संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने उक्त नमूद पोलीस अंमलदारांना सायबर पोलीस स्टेशन येथे कार्यमुक्त करावे आणि अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद आहे. तसेच, प्रभारी अधिकारी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांनी सदर अंमलदारांना हजर करून घेऊन हजर झाले बाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा. बदलीचा निर्णय सायबर गुन्ह्यांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलीस दलाचे कामकाज अधिक बळकट करण्यासाठी घेण्यात आला आहे.






