जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; तीन पोलीस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्या!
जामनेर, जिल्हापेठसह आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी बदलली; रिक्त पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्यांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून दि.६ सप्टेंबर रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे रायगड येथून हजर झाल्यानंतर जामनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती. पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे भंडारा येथून हजर झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती. पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील रागुर्वी येथून हजर झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा, जळगावचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्ती
आदेशानुसार, बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी अथवा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ कर्तव्यावर हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या या आदेशामुळे जळगाव जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या पोलिस ठाण्याच्या नेतृत्वात बदल झाला आहे.






