जळगाव पोलीसदलात ‘हायटेक’ बदल्या, पसंतीने कर्मचारी खुश!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । लोकसभा निवडणूक आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे यंदा पोलीस दलातील बदली प्रक्रिया रखडली होती. आचारसंहिता संपताच प्रक्रिया सुरू झाली असून बदलीसाठी नवीन पध्दतीचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. ऑनलाईन पद्धतीच्या प्रक्रियेत पसंतीच्या ठिकाणी बदली मिळत असल्याने ९० टक्के कर्मचारी खूश आहेत.
दरवर्षी बदली प्रक्रिया सुरू झाल्यावर जिल्हा पोलीस दलातील बदल्या चर्चेचा विषय ठरतो. कोरोनापासून पोलीसदलातील सर्वसाधारण बदल्या एकठोक झालेल्या नव्हत्या. यंदा पोलीस प्रशासनातील बदली प्रक्रिया सुरु झाली असून पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार पदासाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर हे मुलाखती घेत आहे.
ऑनलाईन पद्धतीने बदली मुलाखत
पोलीस प्रशासनात दरवर्षी बदलीसाठी पोलीस अधिक्षकांकडून मुलाखत पद्धत अवलंबली जाते. श्रेणीनुसार एक-एक गटाला बोलावून विचारणा केली जात असते. यंदा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नवीन क्लुप्ती लढवली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात कुणालाही न बोलावता ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉलवर मुलाखत घेतली जात आहे. पोलीस ठाण्यात हजर राहूनच पोलीस कर्मचारी आपले म्हणणे मांडत असल्याने वेळेची देखील बचत होत आहे.
मनासारखी बदली देण्यासाठी प्रयत्नशील
बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना ३ पर्याय विचारण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी शक्यतो त्याच तीन पर्यायपैकी एका ठिकाणी बदलीसाठी होकार देत आहे. कर्मचाऱ्याला तिन्ही ठिकाणी बदली नको असल्यास त्याला दुसरी पसंती विचारून त्याठिकाणी बदली दिली जात आहे. मनासारख्या ठिकाणी बदली मिळत असल्याने कर्मचारी देखील खूश आहे.
ठिय्याबाज, वशिलेबाजांना चपराक
१०० टक्के पोलिसांच्या बदली प्रक्रियेत १० टक्के दिग्गज कर्मचारी आपली जागा सोडण्यास तयार नाही. वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि त्याच पोलीस ठाण्यात स्थगिती मिळवून काही कर्मचारी ठाण मांडून आहेत. यंदा पोलीस अधीक्षक दो.महेश्वर रेड्डी यांनी ठिय्याबाजांना दूर पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे वशिलेबाजांना चपराक बसणार आहे. ठिय्या मांडून असलेले कर्मचारी जाणार असल्याने इतर कर्मचारी मात्र आनंदी झाले आहे.
ऑनलाईन पद्धतीने वाचला वेळ : पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून आम्ही ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेत आहोत. कुणालाही पोलीस ठाणे सोडून यावे लागत नसल्याने वेळेची बचत होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी मागितलेल्या पसंतीनुसार त्यांना बदली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील २-३ दिवसात बदली प्रक्रिया पूर्ण होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.