जळगाव पोलीस अँक्शन मोडवर : नायलॉन मांजा विक्री आणि बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई, ८ ताब्यात

महा पोलीस न्यूज । दि.१५ जानेवारी २०२४ । जळगाव शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत दोन दिवसात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. नायलॉन मांजा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.
नायलॉन मांजा हा मानवी जीवनासह पक्षी आणि इतर प्राण्यांसाठीही धोकादायक आहे. या मांजामुळे अनेकदा दुर्घटना घडतात आणि जीवितहानी होते. त्यामुळे राज्य सरकारने नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. मात्र, काही लोक अजूनही चोरून नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
पतंग उडवतांना नॉयलॉन मांजाचा वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध होणेसाठी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे Suo Moto PIL क्र.08/2020 चे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक दंडप -1/एसआर/2024/03 दिनांक 10/01/2024 अन्वये नायलॉन मांजा विक्री प्रतिबंधीत केलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणा-याविरुध्द कडक कारवाया करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सुचना केलेल्या होत्या.
पोलिसांनी दिनांक १३ आणि १४ जानेवारी रोजी छापेमारी करून कारवाई दरम्यान भा. न्या. संहीता कलम 110,223 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 अन्वये “सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न” या सदराखाली ५ गुन्हे दाखल केले. गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे इसम नामे मयुर दत्तु भोई वय-२३ वर्षे रा.सदगुरुनगर,(अयोध्यानगर), भुषण गजानन बेलेकर वय- २४ वर्षे रा.डि.एन.सी.कॉलेज जवळ जळगाव, अफवान निहाल खान वय-२४ वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव, परवेझ शेख शफी शेख वय-२४ वर्षे रा.काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव, दर्शन संजय शिंपी वय-१९ वर्षे रा.आशाबाबनगर महादेव मंदीरासमोर जळगाव, गितेश भरत सैंदाने वय-१८ वर्षे रा. आशाबाबानगर जळगाव, प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे वय-२१ वर्षे रा.रामेश्वर कॉलनी जळगाव, तुषार सुनिल माळी वय-२३ वर्षे रा.विठोबानगर जुना खेडी रोड जळगाव अशा ८ जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सर्वांकडून ११ नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील २ दिवस देखील अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे. नायलॉन मांजा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.