जळगाव हादरले : नरबळीतून शाळकरी मुलाची गळा चिरून हत्त्या?

महा पोलीस न्यूज । दि.१७ जून २०२५ । जळगाव जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तेजस गजानन महाजन (वय १३, रा. रिंगणगाव ता. एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे. दरम्यान, रात्रीपासून बेपत्ता असलेल्या तेजसच्या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस महाजन हा विद्यार्थी आई, वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून कृषी केंद्र दुकान चालवून उदरनिर्वाह करीत आहेत. सोमवार दि.१६ जून रोजी गजानन महाजन हे मुलगा तेजस याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता. रात्री दुकान बंद केल्यानंतर तेजसने गावातच बिर्याणी खाल्याचे समजते.
रात्रभर ग्रामस्थांकडून शोधाशोध
तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र रात्री उशीर होऊन देखील तेजस घरी आला नाही. कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. रात्री कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता.
खर्ची गावाजवळ आढळला मृतदेह
मंगळवारी पहाटेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
नरबळीचा संशय, तिघे ताब्यात
घटनास्थळी पोलीस आणि मोबाईल फॉरेनसिक पथक दाखल झाले असून तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती असून नरबळीच्या प्रकारातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा सखोल तपास पोलीस करत असून खुनाच्या घटनेमुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :