Detection

घरफोडीच्या टोळीचा ‘द एंड’ : जळगाव तालुका पोलिसांनी लावला १० गुन्ह्यांचा छडा, ५ आरोपी जेरबंद!

मुख्य आरोपीवर तब्बल १३ गंभीर गुन्हे : पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाने संपूर्ण टोळी गजाआड

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बंद घरे हेरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी करणारी टोळी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना देत प्रभावी तपास करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर सातत्याने पाळत ठेवण्याचे नियोजन केले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने अथक प्रयत्न करत जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४)) च्या तपासादरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महत्त्वाची माहिती मिळवली.

५ संशयीत आरोपी ताब्यात
माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचून पाच अट्टल आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून, दीपक बापू पाटील (वय २३, पंचशील नगर, तांबापुरा), राजेश माणिक राठोड (वय २४, तांबापुरा), सुमित संजय कोळी (वय १९, रामेश्वर कॉलनी) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, तांबापुरा, जळगाव) यांचा समावेश आहे.

९ घरफोडीचे गुन्हे, १ मोटार वाहन चोरीचा गुन्हा
पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये ९ घरफोडीचे गुन्हे आणि १ मोटार वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी घरफोडीतील २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुख्य आरोपी अट्टल गुन्हेगार
या टोळीचा मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ११, जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये १ आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये १, असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. घरफोडीच्या मालिकेचा छडा लावून अल्पावधीतच आरोपींना अटक केल्याने जळगाव तालुका पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

एमपीडीए कारवाईतील एक गुन्हेगार जाळ्यात
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते. अखेर जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि प्रभावी नियोजनाच्या बळावर संपूर्ण टोळीला जेरबंद करत घरफोडीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावला.

या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजिता येडले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे, तसेच वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील आणि पंकज देशमुख यांनी उत्कृष्ट समन्वय साधत ही धडक कारवाई यशस्वी केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button