Detection Story : जळगावच्या तरूणांनी पुण्यात लुटली क्रिप्टोकरन्सी, एलसीबीने आवळल्या मुसक्या

महा पोलीस न्यूज । ३ ऑगस्ट २०२४ । आजकालचा जमाना ऑनलाईन आभासी चलनाचा असून त्यात क्रिप्टोकरन्सीचे फॅड वाढले आहे. पुण्यात असेच स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती घेण्याच्या बहाण्याने गाडीतून अपहरण करून १६ लाख रुपयांची क्रिप्टो करन्सी ट्रान्स्फर केल्याची घटना दि.२२ जुलै रोजी घडली होती. पुणे पोलिसांनी याबाबत तपास काढला असता जळगावातील आरोपींनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने सापळा रचून ५ संशयितांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे बावधन येथील उमेश त्र्यंबकेश्वर हेडाऊ हे स्टॉक मार्केटबाबत मार्गदर्शन करतात. मयूर अमोदकर व त्याचे साथीदारांनी स्टॉक मार्केटबाबतच्या कोर्सची माहिती घेण्याचा बहाणा केला. दि.२२ जुलै रोजी त्यांनी हेडाऊ यांच्याशी संपर्क करीत बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील थर्ड वेव्ह कॅफे समोरून त्यांच्याकडील इनोव्हा गाडीमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून शिक्रापूर येथे नेले. पाच जणांनी वाहनात तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमधील बायनान्स एक्स्चेंज अॅप्लिकेशनमधून १६ लाख २ हजार ५१० रुपयांचे युएसडीटी क्रिप्टोकरन्सी जबरदस्तीने ट्रान्स्फर करून घेतले.
पुणे पोलिसांनी सुरु केला तपास
घटनेनंतर उमेश त्र्यंबकेश्वर हेडाऊ (वय २६, रा.ड्रीम रिधम सोसायटी, बावधन) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. प्रथमदर्शनी पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता संशयीत आरोपी जळगाव येथील असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना याबाबत माहिती मिळताच एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांनी मयूर कैलाश अमोदकर (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि मनीष राजेंद्र भोंडे (वय २४, रा. मोहाडी रस्ता, जळगाव) यांच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकीसह दोघांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मयूर कैलाश अमोदकर (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि मनीष राजेंद्र भोंडे (वय २४, रा. मोहाडी रस्ता, जळगाव) यांना न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.शिंदे यांनी अपहरण करून १६ लाख रुपयांची क्रिप्टो करन्सी ट्रान्स्फर केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस तपासात आणखी तिघांची नावे समोर आल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झाले.
कानळदा येथे आल्याची मिळाली टीप
गुन्ह्यातील तिघे फरार संशयित कानळदा गावात चुलत मावशीच्या घरी आल्याची माहिती एलसीबीचे कर्मचारी रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळविल्यावरुन त्यांनी पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी अशांचे पथक तयार करून आरोपीतांना ताब्यात घेवून त्याबाबत शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
सापळा रचून आवळल्या तिघांच्या मुसक्या
पथकाने खाजगी वाहनाने जात कानळदा गावात जावून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता तिथे कानळदा ते भोकर रोडवरील गावाचे बाहेर असलेल्या निळया रंगाचे टपरीजवळ बसले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. पावसामुळे परिसरात चिखल असल्याने चिखलातून वाट तुडवीत पथक हे अंतराअंतराने पायी जावून तिथे धडकले. तिन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जितेंद्र उर्फ जितु प्रदिप वाघ, वय ३२, रा. वाघ नगर जळगाव, भुषण गोकुळ कोळी, वय २७, रा. समतानगर जळगाव, चंद्रशेखर उर्फ चंदु रमेश देशमुख, वय ३३ रा. महाबळ जळगाव असे नाव सांगितले.
पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले
तिघांना ताब्यात घेवुन त्यांना पुणे येथील घटनेबाबत विचारपुस केली असता त्यांनी चतृःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर CCTNS NO ६४२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१० (२),१४०(२), आर्म अॅक्ट ४/२५ या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने केली आहे.