ब्रेकिंग : माजी महापौरांसह ‘हे’ दिग्गज नगरसेवक आज करणार भाजप प्रवेश!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची असलेल्या जळगाव शहर महापालिकेतील माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह दिग्गज नगरसेवक आज भाजप प्रवेश करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा जि.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालय येथे पार पडणार असून त्यानंतर जळगावातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह डझनभर नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या ३ महिन्यांपासून सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर संकट, सण उत्सव आणि काही सदस्यांना प्रवेश द्यायचा की नाही यावरून आजवर प्रवेश लांबला होता. दरम्यान, प्रवेशाला आज मुहूर्त मिळाला असून दुपारी ४ वाजत प्रवेश होणार असल्याचे समजते.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जि.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आण्णा भापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, हर्षा अमोल सांगोरे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदींसह इतर मान्यवर प्रवेश करणार असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली आहे. तरी सायंकाळी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रवेशाने मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत.






