घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार् जेरबंद !

घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार् जेरबंद !
जामनेर पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील शहापूर येथील घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी अकरम शहा याला जामनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जामनेर येथील बिस्मिल्ला नगरातील रहिवासी असलेला अकरम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
शहापूर येथील सुरेश रामदास डोंगरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम, दागिने आणि मोबाइल असा एकूण ७४,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरला होता. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कसून तपास करत अकरम शहा याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा सर्व मुद्देमाल, ज्यात रोख रक्कम, सोने आणि मोबाइलचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल सचिन महाजन, विशाल लाड, योगेश पाटील, अमोल पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल आशा पांचाळ आणि चालक पोलिस नाईक चंद्रशेखर नाईक यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी जामनेर पोलिसांचे कौतुक केले आहे.






