जामनेर अत्याचार : ..हीच पवार साहेबांची राष्ट्रवादी का?
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका ६ वर्षीय चिमुकलीची शेतात घेऊन जात हत्त्या करण्यात आली. संपूर्ण समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेने प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झाली आहे. घटनेच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातर्फे पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले जाणार होते. एक तर ४.३० वाजेची वेळ ठरलेली असताना पदाधिकारी पोहचलेच नाही उलट ३० मिनिटांनी पावसामुळे आजचे निवेदन रद्द करण्यात आले. गेल्या विधानसभेला भर पावसात सभा घेऊन जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवणारे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार आणि आज गंभीर घटना असतानाही पावसामुळे रद्द केलेले निवेदन यावरून जळगाव जिल्ह्यात खरच शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी राहिली का? असा प्रश्न उपस्थित राहतो.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एक गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. खाऊच्या बहाण्याने बोलवत एका ६ वर्षीय चिमुकलीला शेतात घेऊन जात तिची हत्त्या करण्यात आली. स्थानिक माहिती आणि प्रथमदर्शनी अंदाजानुसार चिमुकलीवर अत्याचार करून तिची गळा आवळत हत्त्या करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. घटनेतील संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न झाले असले तरी अद्याप तो फरार आहे.
जळगाव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे समाजात चीड निर्माण झाली असून त्या नराधमाला तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. जामनेर शहरात गुरुवारी मोर्चा देखील काढण्यात आला होता. घडलेली घटना अतिशय हीन आणि क्रूर असून एका निरागस चिमुकलीच्या जिवाचा विचार करता समाजमनाच्या संवेदना सुन्न झाल्या आहे. जनभावना तीव्र होत असताना सर्वच निषेधार्थ पुढे येत आहे.
नियोजन चुकले, निवेदन रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातर्फे काही पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते गुरुवारी दुपारी ४.३० वाजता पोलीस अधिक्षकांना निवेदन देणार होते. राजकारणी असल्याने ठरलेल्या वेळेवर कुणी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचलेच नाही. १० मिनिटे उशिरा येतील असे समजून माध्यम प्रतिनिधी २० मिनिटे थांबले आणि पाऊस सुरु झाला. अखेर अर्ध्या तासाने निवेदन देण्याचा आजचा विषय पावसामुळे रद्द झाल्याचे कळविण्यात आले. तसेच उद्या दि.१४ रोजी दुपारी निवेदन दिले जाणार असल्याचे त्यात सांगण्यात आले.
निवेदन देण्याचा अट्टाहास कशासाठी?
गेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा येथे भर पावसात ८० वर्षाच्या पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांनी सभा घेतली आणि जनतेच्या मनावर पुन्हा आपली छाप सोडली. एकीकडे पवार साहेब जनतेसाठी पावसात भिजले तर दुसरीकडे जळगावात पावसाला घाबरून संवेदनशील विषयाचे निवेदन रद्द करण्यात आले. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे निवेदन केवळ प्रसिद्धीसाठी होते की पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी हेच कळाले नाही.
जळगावात पक्षात सर्व आलबेल
पावसाचे कारण देणे कितपत योग्य होते हे पोलीस, माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेला देखील उमगले नाही. जळगावच्या राष्ट्रवादीत असेही सर्व आलबेलच असून ते अनेकदा दिसून आले आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणी किती प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले हे निकालावरून दिसूनच आले. निकाल लागला तरी आजही कोण कोणत्या मतदारसंघात फिरला यावरून उणेदूने काढले जात आहे. असो भविष्यात तरी जळगावचे पदाधिकारी विषयाचे गांभीर्य ओळखतील आणि वेळेवर योग्य निर्णय घेतील हीच अपेक्षा.