Politics

महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये जयश्री महाजन यांचा प्रचार दौरा

जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचाराला महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात केली. (दि.१५) सायंकाळी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील महादेव मंदिरात त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित व्हावा व जळगावच्या विकासाला गती मिळावी, अशी प्रार्थना केली.

शहरातील म्युनिसिपल कॉलनी, शास्त्री नगर, अंबिका सोसायटी, भगवान नगर, मुंदडा नगर, भूषण कॉलनी, पोस्टल कॉलनी, पॉलिटेक्नीक कॉलेजच्या मागील बाजू या मार्गे एकलव्य क्रीडा संकुल येथे प्रचार दौऱ्याचा समारोप झाला. या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आपल्याला येत असलेल्या समस्या जयश्री महाजन यांच्यासमोर मांडल्या. काही ठिकाणी अद्यापही रस्त्यांची दुरवस्था असून, पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याशिवाय, स्ट्रीट लाईटच्या कमतरतेमुळे सुरक्षेच्या समस्या आणि महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला.

जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, नागरिकांच्या या समस्यांचे लवकर निराकरण होण्याबाबत त्यांना आश्वासन दिले. महिला सुरक्षेच्या विषयाकडे मी प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “मी एक महिला असल्याने महिलांच्या समस्या आणि अपेक्षा समजते. आपल्याकडून मांडलेल्या समस्या प्रामुख्याने सोडवण्याचे माझे वचन आहे. जळगाव शहराचा विकास गतिमान करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महाजन यांचा प्रचार दौरा पुढील काही दिवस जळगावच्या विविध भागांमध्ये सुरू राहणार आहे. विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नागरिकांच्या पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

या प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी लक्षणीय उपस्थिती होती. ठिकठिकाणी औक्षण करून जयश्री महाजन यांचे स्वागत केल्यानंतर महिला स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होत त्यांना पाठिंबा व्यक्त करत होत्या. एक महिला उमेदवारच आपल्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु शकते, असा विश्वास महिलांनी यावेळी व्यक्त केला.

प्रचार दौऱ्यामध्यिे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. दिवसेंदिवस जयश्री महाजन यांच्या सकारात्मकतेमुळे व संवेदनशील वत्कृत्वाने तसेच भविष्यातील शहर विकासाच्या आराखड्याने जळगावकर प्रभावित होत असून, जयश्री महाजन यांच्या उमेदवारीबाबत शहरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button