जळगाव शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्याकडे जनतेचा सकारात्मक कौल…
जळगाव प्रतिनिधी|
जळगाव शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई महाजन यांच्या प्रचाराला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी घेतलेली आक्रमक प्रचारमोहीम, जनतेशी थेट संवाद, आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांच्याकडे जनतेचा सकारात्मक कौल असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
जयश्रीताईंनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांत प्रचार रॅली काढत जनतेशी संवाद साधला. फक्त आश्वासनांवर चाललेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीला आव्हान देत, त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी एक ठोस धोरण आखण्याचे आश्वासन दिले. शहरातील प्रत्येक भागात जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास दिला.
जयश्री महाजन यांनी प्रचारादरम्यान तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था, अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता, तसेच रस्त्यांमुळे होणारे अपघात यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. “गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहराचा विकास खुंटलेला आहे. लोकांचे जीव जाण्यास भाग पाडणारे रस्ते आणि वाढत्या बेरोजगारीने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावर उपाययोजना करण्यासाठीच जनतेने आता मशाल चिन्हावर बटण दाबावे,” असे आवाहन त्यांनी केले.
जयश्री महाजन यांना प्रचारादरम्यान नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रत्येक ठिकाणी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव करून, सत्कार करून, लोकांनी आपले प्रेम व आदर व्यक्त केला. या प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिकच बळकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
“आम्ही जनतेचा विश्वास पात्र ठरून त्यांचा हक्क त्यांना मिळवून देऊ. जळगावच्या विकासाला एक नवा चेहरा देऊ,” असे जयश्री महाजन यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले. त्यांनी मतदारांना फक्त आश्वासनांवर राहणारे नेते न निवडता विकासासाठी सक्षम नेतृत्वाला मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जयश्री महाजन यांच्या प्रचारमोहीमेला अधिकच गती मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने निवडणुकीत आक्रमक लढत दिली आहे. शहरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेविषयीचा विश्वास वाढत असून, मशाल चिन्हावर मतदारांचा भर असल्याचे चित्र आहे.