Education

जळगाव विद्यापीठाने केला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , महात्मा गांधी मिशन विद्यापीठांशी सामंजस्य करार

जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकावेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्यासमवेत सामंजस्य करारावर आज दि. १ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी करून विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मध्ये एक महत्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनवणे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ, कबचौउमविचे प्र. कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कबचौउमविचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड व एम. जी. एम. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी कबचौउमविने तयार केलेले यासंदर्भातील माहितीपत्रकाचे प्रकाशन कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांच्या हस्ते तर विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त अशा पोर्टल फॉर टू डिग्री प्रोग्राम सायमंटेनिअसली या संकेतस्थळाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. हे पोर्टल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmu.ac.in यावर उपलब्ध आहे. या विद्यापीठांशी करार केल्यामुळे कबचौउमविच्या विद्यार्थ्यांना शेतीबाबतचा अभ्यासक्रम, ड्रोन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( औषधीशास्त्र, शेती तंत्रज्ञान) या सारखे अनेक नवनवीन अभ्यासक्रम नियमित पदवी करतांनाच शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना यासोबतच नाविन्यपूर्ण अध्ययन, व्यक्तिमत्व विकास, नोकरीच्या विस्तृत संधी, करीअर पर्यायाची उपलब्धतता, व्यापक शैक्षणिक संधी असे अनेक फायदे होणार आहेत.

याप्रसंगी प्रा. विलास सपकाळ यांनी बोलताना सांगितले की, आगामी काळ विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठांनी तसे अभ्यासक्रम तयार करून देण्याचा आहे. त्या अनुषंगाने या सामंजस्य करारा बाबत कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी चांगला पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होणार आहे. असे सांगत त्यांच्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती दिली.

कुलगुरु प्रा. संजय सोनवणे यांनी सांगितले की, २०४७ मधील विकसित भारत या अनुषंगाने नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. आजचा करार हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विद्यापीठांनी एकमेकांसोबत सहकार्य व संयुक्तपणे काम करून विकसित राष्ट्र घडविणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांच्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती दिली.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुआयामी, लवचिक व आंतर विद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. दोन नियमित अभ्यासक्रम तासिकांचे वेळापत्रक सकाळ/सायंकाळ अशा सत्रात ठेवून किंवा एक नियमित अभ्यासक्रम आणि एक दूरस्थ अभ्यासक्रम अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. ही व्यवस्था करून देणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे अग्रस्थानी आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड/छंद असलेला अभ्यासक्रम नियमित अभ्यासक्रमासोबत करता येईल. काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धतेसाठी किमान एक कौशल्य अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी. पी पाटील, आय क्यू. ए. सी. संचालक प्रा. मधुकर शेवाळे, प्रा. हेमंत राजगुरू, एमजीएम विद्यापीठातर्फे आय क्यू. ए. सी. संचालक प्रा. परमिंदर कौर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. समीर नारखेडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन कुलसचिव डॉ. विनोद पाटील तर आभार आय. क्यू. ए. सी. संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी मानले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button