करण पाटलांच्या प्रचारासाठी पत्नीने खोचला पदर, शालकाने बांधला रुमाल
महा पोलीस न्यूज | २ मे २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील – पवार यांच्या प्रचारार्थ आता पत्नी अंजली आणि शालक देखील मैदानात उतरले आहे. कडक उन्हात दोघे वैशाली सुर्यवंशी यांच्या साथीने ग्रामीण भागात प्रचाराची धुरा सांभाळत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले असून महा विकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील हे प्रचाराला लागले आहेत. एक दिवस ग्रामीण तर एक दिवस शहरी असा प्रचार सुरू आहे. करण पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी प्रचार करीत आहेत.
करण पाटील देखील सकाळपासून प्रचार दौऱ्यात व्यस्त राहत असून रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू राहत आहे. पाचोरा, पारोळा, भडगाव ग्रामीण भागात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या साथीने आता पती करण पाटील यांच्या प्रचारार्थ पत्नी अंजली पाटील आणि शालक विजय भोसले हे देखील मैदानात उतरले आहेत. तळपत्या उन्हात पदर खोचून अंजली पाटील ग्रामीण भागात दौरा करीत असून विशेषतः महिला वर्गाशी संवाद साधत आहेत. शालक विजय भोसले हे देखील शाहगड येथून जळगावात आले असून प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.