
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । थोर शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख करून देणारे ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शन’ जळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नूतन मराठा महाविद्यालय, विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे चेअरमन आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील असतील.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी आणि जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महारांगोळी, दुर्मिळ छायाचित्रे अन् व्हिडिओंची मेजवानी
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनासाठी केलेले कार्य, त्यांचे शैक्षणिक विचार आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेला प्रेरणादायी संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. त्यांच्या जीवनातील विविध टप्पे आणि कार्याचा प्रवास भव्य महारांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. यासोबतच त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींचे विशेष सादरीकरणही प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
कर्मवीरांच्या विचारांपासून प्रेरणा घेत विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगावची स्थापना झाली. समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षात आयोजित या प्रदर्शनातून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तीन दिवस नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश
हे प्रदर्शन १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि जळगावकर नागरिकांना या प्रदर्शनाचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाचा आणि समाजहिताच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






