ब्रेकिंग : हॉटेलमध्ये गोळीबार, दोन गोळ्या लागल्याने मालक गंभीर जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेल्या हॉटेल रायबा येथे गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. यावल) यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेली हॉटेल रायबा प्रमोद श्रीराम बाविस्कर यांच्यासह सहकाऱ्यांनी भाड्याने घेतली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी खांद्याला लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
खाजगी रुग्णालयात ऑपरेशन सुरू
जखमी अवस्थेत प्रमोद बाविस्कर यांना तातडीने जळगाव येथील अरुश्री हॉस्पिटल येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळ्या शरीरात असल्याने तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ.परिक्षित बाविस्कर यांनी सांगितले.
पोलिसांचा तपास आणि घटनास्थळावर धाव
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक रिकामे काडतूस सापडले आहे. गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.
परिसरात खळबळ
मनुदेवी फाटा हा यावल तालुक्यातील महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.