अमळनेर नगरपालिकेकडून करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करण्याची मागणी

अमळनेर| पंकज शेटे – आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीने अमळनेर नगरपालिका प्रशासनाकडे करवाढ, शास्ती आणि लोकवर्गणी रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना अंतिम निवेदन दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही, केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, अमळनेरकरांवर लादलेली करवाढ आणि इतर शुल्क सक्तीने वसूल केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने शास्ती माफी आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्काबाबत निर्णय घेतला आहे. असे असूनही, नगरपालिका प्रशासन शासनाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत वसुली सुरू ठेवत आहे.
या गंभीर विषयावर पत्रकार बांधवांनीही आवाज उठवला होता, मात्र तरीही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता १५ ऑगस्टपर्यंत यावर योग्य निर्णय घेण्याची अंतिम विनंती करण्यात आली आहे. जर १५ ऑगस्टपर्यंत अमळनेरकरांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला नाही, तर १७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर रणजित पाटील, नरेश कांबळे, बाळासाहेब संदानशिव, सय्यद कादिर, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, पंकज भोई, प्रकाश माळी, पंकज चौधरी, नविद शेख, दिपक चौगुले, पंकज मोरे, भरत पवार, विपुल पाटील, शुभम यादव, नईम पठाण, कुंदन पाटील, पारस धाप, सागर साळी, आणि राम खेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासोबतच कार्यकर्त्यांनी शासनाच्या निर्णयाची प्रत मुख्याधिकाऱ्यांना देत सविस्तर चर्चा केली.






