कायदेविषयक जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) –महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व म अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांचे आदेशाने तसेच सचिव श्री. पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी १२.३० वाजता पोदार इंटरनॅशनल स्कूल (CBSE), जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमात कायद्याविषयक महत्त्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मा. सचिव श्री. पवन एच. बनसोड, शाळेचे प्राचार्य श्री. गोकुळ मंसाराम महाजन, लोकअभिरक्षक कार्यालयाच्या सहायक अॅड. श्रीमती शिल्पा व्ही. रावेरकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या मा. श्रीमती शांता वाणी यांनी मार्गदर्शन केले.
या जनजागृतीपर कार्यक्रमात “मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९”, “६ ते १४ वयोगटातील मुलांचे शैक्षणिक हक्क”, “अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत हक्क”, “लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)”, “प्रदूषणमुक्त पाणी व हवा, वाजवी निवासस्थान व अन्नाचा अधिकार”, “कायदेशीर जागरूकतेचे फायदे व पद्धती”, “नागरिकांची मूलभूत कर्तव्ये” तसेच “अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी कायदा” यांसारख्या विषयांचा समावेश होता.
कार्यक्रमात शाळेचे प्रशासकीय अधिकारी, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती अंकिता मुंदडा यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री. संतोष एस. तायडे, श्री. राहुल कै. साळुंखे, श्री. तेजस जगताप व श्री. जितेंद्र आनंदा भोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिकांमध्ये कायद्याची माहिती व जनजागृती घडवून आणण्याचा उपक्रम प्रभावी ठरला.