चोपड्यात सिनेस्टाईल पाठलागानंतर ८ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

महा पोलीस न्यूज । दि.२२ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सिनेस्टाईल पाठलाग करत तब्बल ८ किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ६२ हजार रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, चोपडा तालुक्यातील गलंगी गावाकडून दोन व्यक्ती मोटरसायकलवरून गांजा विक्रीसाठी चोपडा शहराकडे आणत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील आणि दीपक माळी यांना पाळतीवर ठेवले.
पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी शहराच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर तिन्ही पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखाच होता. दरम्यान, पोलिसांनी पुढे शहरात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे आणि विलेश सोनवणे यांना माहिती देऊन नाकाबंदी केली. पोलिसांची नाकाबंदी दिसताच आरोपींनी मोटरसायकलवरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक वलटे यांनी धावत जाऊन एका संशयीत आरोपीला पकडले.
चौकशीअंती त्यांची नावे उदयभान संजय पाटील (वय २१, रा. चांग्या निम जवळ, अडावद, ता. चोपडा) आणि योगेश रामचंद्र महाजन (वय २१, रा. खालचा माळीवाडा, अडावद, ता. चोपडा) अशी निष्पन्न झाली. त्यांच्याकडून मोटरसायकल क्रमांक एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५, ८ किलो १३० ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २० (ब), २० (ब) (२), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, दीपक चौधरी, मदन पावरा, महेंद्र पाटील आणि अतुल मोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईला यामुळे मोठे यश मिळाले आहे.