लाचखोर एलसीबी निरिक्षकाकडे सापडले करोडोंचे घबाड, वाचा सविस्तर..

महा पोलीस न्यूज | २ एप्रिल २०२४ | धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन निरीक्षक दत्तात्रय शिंदे यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, निरीक्षक शिंदे यांच्या घर झडतीत लाखोंचे दागिने आणि करोडोंच्या मालमत्तेचे दस्तऐवज मिळून आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांचे विरूध्द सापळा कारवाई होवुन त्यांचे विरूध्द दि.२ एप्रिल रोजी दोंडाईचा पो.स्टे. येथे भ.प्र.अधि. कलम ७.७ (अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली होती. तिघांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहते घराची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घर झडती घेतली असता घर झडती दरम्यान सुमारे ६० लाखांचे सोन्याचे बिस्कीटे व दागिने तसेच सुमारे ७७ हजारांची चांदीचे भांडी व दागिने जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या व कुटुंबाचे आणि इतर व्यक्तींच्या नावे असलेले सुमारे १ कोटी ७५ लाख रूपयाच्या स्थावर मालमत्तेचे खरेदी खताची दस्ताऐवज देखील पथकाने जप्त केले आहे. त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.
गुन्हयाचा पुढील तपास धुळे ला.प्र. विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी करीत आहेत.