मद्यपींसाठी खुशखबर : उद्याचा ‘ड्राय डे’ रद्द, जाणून घ्या कारण..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेला ‘कोरडा दिवस’ (Dry Day) रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांनी आज २ डिसेंबर रोजी हे सुधारित आदेश जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आधीच्या कार्यक्रमानुसार, जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ डिसेंबर रोजी ‘ड्राय डे’ (मद्यविक्री बंद) जाहीर केला होता. मात्र, आता मतमोजणीच्या तारखेत बदल करण्यात आला असून, मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
मतमोजणीची तारीख बदलून २१ डिसेंबर झाल्यामुळे, उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजीचा ‘कोरडा दिवस’ रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या जळगाव जिल्ह्यातील संबंधित १८ नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने नियमित सुरू राहतील.
सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना या सुधारित आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही.टी.भुकन यांनी केले आहे.






