लोकसभा निवडणूक जाहीर : महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान
महा पोलीस न्यूज | १६ मार्च २०२४ | देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक कधी जाहीर होणार याची वाट पाहिली जात आहे. भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवारी पार पडली असून देशात ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार हे आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणूक म्हणजे एक उत्सव असतो. निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. देशात यंदा ९६ कोटी ८८ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहे. देशात १० लाख मतदान केंद्र आहे. आम्ही गेल्या दोन वर्षात सर्व राज्यात जावून पाहणी केली आहे. यंदा १.८२ कोटी मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. ५५ लाख ईव्हीएम मशीनचा उपयोग केला जाणार आहे. निवडणुकीत २१.५ युवा मतदार आपला हक्क बजावतील. देशात ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया राबविणे एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, गुन्हे विषयक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीन वेळा वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल. पैसे वाटपाची काही तक्रार असली तर ॲपद्वारे तक्रार केल्यास आपल्या लोकेशनच्या मदतीने आमचे अधिकारी त्याठिकाणी पोहचू शकतील. निवडणुकीत वादविवाद, रक्तपात याला कुठेही स्थान नाही. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. हिस्ट्रीशिटरवर नजर ठेवली जाणार असून सोशल मीडियावर आमचे लक्ष राहणार आहे. खोट्या बातम्या, माहिती रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कुणीही जाती, धर्माच्या आधारे मत मागू नये, प्रचारात लहान मुलांचा उपयोग करू नये. एकमेकांबद्दल अपशब्द वापरू नये, असे ते म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यंदा लोकसभा निवडणुकीसोबत ४ राज्यांची विधानसभा निवडणूक देखील होणार आहे. लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २०, सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्पात मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी नोटीफिकेशन – १८ एप्रिल, अर्ज भरण्याची मुदत – २५ एप्रिल, अर्ज छाननी – २६ एप्रिल, माघार – २९ एप्रिल, मतदान – १३ मे, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.