लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजाचा आरसा; मुक्ताईनगर जे. ई. स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा

लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजाचा आरसा; मुक्ताईनगर जे. ई. स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा
मुक्ताईनगर: मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील जगजीवन दास (जे. ई.) इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात समाजाला दिशा देणाऱ्या स्थानिक पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी पत्रकारितेच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पत्रकार हे खऱ्या अर्थाने समाजाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या निर्भीड लेखनामुळेच सामान्यांवरील अन्यायाला वाचा फुटते आणि विकास प्रक्रियेला गती मिळते. मुक्ताईनगरच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत पत्रकारांचे कार्य अत्यंत मोलाचे असून, लोकहिताच्या या लढ्याला शाळा नेहमीच पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी उपस्थित पत्रकार विनायक वाडेकर, शरद बोदडे, सचिन झनके आणि अमोल जावरे यांनी आपल्या भाषणातून पत्रकारितेचे महत्त्व आणि बदलत्या काळातील आव्हाने यावर प्रकाशझोत टाकला. पत्रकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील शिक्षण, शेती आणि आरोग्यविषयक समस्या मांडण्यात माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची असते, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर आधारित छोटेखानी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय ठाकूर यांनी केले. या सोहळ्याला शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






