लव्ह मॅरेज नोंदणीसाठी पालकांची संमती अनिवार्य करा : सरकारकडे मागणी

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । महाराष्ट्रामध्ये प्रेमविवाहाच्या वाढत्या घटना आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक व कौटुंबिक प्रश्न लक्षात घेऊन ‘भारत जागृत मंच’ आणि ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ या संघटनांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्यातील प्रेमविवाहाच्या कायदेशीर नोंदणीसाठी (Registration) तरुण मुला-मुलींच्या पालकांची उपस्थिती आणि लेखी संमती (Consent) अनिवार्य करावी, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी राज्य सरकारला दिले आहे.
अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी अमळनेर तहसीलदारांच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा, नाशिक विभागीय आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांसारख्या उच्च अधिकाऱ्यांकडे हे निवेदन सादर केले.
कुटुंब व्यवस्था धोक्यात
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आज अनेक तरुण मुले-मुली पालकांना न कळवता किंवा त्यांची संमती न घेता विवाह करत आहेत. यामुळे कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडत आहे. अशा विवाहातून अनेक गुन्हेगारी कृत्यं आणि दुर्देवी घटना समोर येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मुले पकडली गेल्यानंतर जन्मदात्या आई-वडिलांना ओळखण्यासही नकार देतात, ज्यामुळे पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.
संतोष पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले: “केवळ विवाह नोंदणी करणे हे सरकारचे काम नाही, तर विवाह सामाजिक आणि कौटुंबिक परंपरेनुसार झाला पाहिजे. जर धर्मांतर कायद्यात पालकांच्या संमतीची अट आहे, तर विवाह कायद्यातही ती असायलाच हवी. अविचारी कृत्ये थांबवून कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सरकारने तातडीने कठोर कायदा करावा.”
या मागणीनुसार, आई-वडील किंवा पालकांच्या गैरहजेरीत झालेले किंवा त्यांची संमती नसलेले कोणतेही लग्न कायदेशीर (Legal) ठरवू नये, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कुटुंबाचे संरक्षण आणि सामाजिक सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी या अति-तातडीच्या विधेयकाला मंजुरी द्यावी, अशी विनंती भारत जागृत मंचने केली आहे.






