
गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध-एकनाथ खडसें
गिरीश महाजन यांचं खडसेंना थेट प्रत्युत्तर ; “मी सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्याने …
जळगाव (प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. खडसेंनी महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता गिरीश महाजन यांनीही खडसेंना तिखट प्रत्युत्तर दिलं आहे.
खडसेंचे आरोप काय?
एका व्हिडिओद्वारे एकनाथ खडसे यांनी दावा केला की, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत म्हटलं की, “शाह यांच्याकडे महाजन यांचे कॉल रेकॉर्ड आहेत आणि रात्री दीड वाजेनंतर त्या अधिकाऱ्याला अनेक वेळा फोन झाले आहेत.”
खडसे म्हणाले की, “गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी एक क्लिप प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे. महाजन आणि महिला अधिकाऱ्याचे संबंध होते, हे शाह यांनाही माहिती आहे.”
महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया
गिरीश महाजन यांनी या आरोपांचं पूर्ण खंडन करत खडसेंना खुलेआम आव्हान दिलं आहे. ते म्हणाले:“मी जर तुमच्या घरातली एक गोष्ट बाहेर सांगितली, तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील. एकही पुरावा द्या, मी ताबडतोब राजकारणातून निवृत्त होईन. खोटं बोलताना लाज वाटत नाही का?”
महाजन यांनी खडसेंवर फसव्या पत्रकारांच्या मदतीने खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. “एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलून धरला आहे. माझा अंत पाहू नका. मी जर बोलायला लागलो तर खडसेंना तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल,” असं ते म्हणाले.
राजकारणात वादाच्या नव्या फेरीला सुरुवात?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष नवीन नाही. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. खडसे यांनी दिलेले पुरावे आणि महाजन यांची प्रतिक्रीया पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.