मनपाच्या सहाय्यक नगर रचना अधिकाऱ्याला पंधरा हजाराची लाच घेताना अटक
जळगाव : – बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेतील नगर रचना विभागातील सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे (वय ३४, रा. खेडी, बु. जळगाव) यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण ३ प्रकरणे दाखल केलेले आहेत, पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले. तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रादार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीनुसार उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोउनि सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांच्या पथकाने सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नगररचना विभागाचेव. वा. वाचनायल परिसरात असलेल्या कार्यालयात सापळा रचला. पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडले.