
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून राज्य शासनाने अधिकृतपणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने (मंत्रालय) तातडीचे परिपत्रक काढून महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
उपमुख्यमंत्री महोदयांच्या निधनाप्रीत्यर्थ आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी, राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्य दुखवटा पाळला जाईल. दुखवट्याच्या काळात राज्यातील सर्व इमारतींवर, जेथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तेथे तो अर्ध्यावर फडकवण्यात येईल.
या तीन दिवसांच्या कालावधीत सरकारतर्फे कोणताही अधिकृत मनोरंजन किंवा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. शासनाने या दुःखद प्रसंगी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.






