
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला मतमोजणी पार पडेल. नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होईल.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला आदी प्रमुख महानगरपालिकांचा यात समावेश आहे.
या निवडणुकीत राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पूर्वी काही अडथळे होते, मात्र आता केवळ दोन महापालिकांमध्ये ५० टक्के मर्यादा ओलांडली असल्याने उर्वरित २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य झाले आहे. मतदार याद्या १ जुलै २०२५ च्या आधारावर अंतिम करण्यात आल्या असून, दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या प्रमुख शहरांतील महापालिकांचा समावेश:
• मुंबई परिसर : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर
• पश्चिम महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी
• उत्तर महाराष्ट्र : नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव
• मराठवाडा : लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर
• विदर्भ : नागपूर, अकोला, अमरावती
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षांची तयारी आता जोर धरेल. या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.






