पोलीसदलातील बाप माणूस ‘किसनराव नजन-पाटील’
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | पोलीस प्रशासन आणि माझं नाते तसे फार जुने नव्हे पण फक्त १४ वर्षांचे आहे. पोलीसदलात आजवर अनेक अधिकारी आले आणि गेले, संबंध सर्वांशी जोपासले मात्र मोजकेच जवळचे झाले. पोलीसदलात अधिकारी काही वर्षच संपर्कात येतात पण काही कायम घर करुन जातात. क्राईम रिपोर्टर म्हणून एलसीबी निरीक्षकाशी नेहमी संबंध येतो. जळगाव एलसीबीच्या बाबतीत बोलायचं झाले तर १४ वर्षापूर्वी भेटलेले निरीक्षक डी.डी.गवारे साहेब आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले किसनराव नजन-पाटील साहेब दोघं बाप माणूस.
जळगाव जिल्ह्यात १४ वर्षापासून क्राईम रिपोर्टिंग करताना अनेक वरिष्ठ अधिकारी आले आणि गेले. विशेषतः आयपीएस अधिकारी २-३ वर्षासाठी येऊन कर्तव्य निभावून गेले. जवळपास प्रत्येकाशी आजही संबंध कायम आहेत. आयपीएस अधिकारी क्वचितच पुन्हा परिक्षेत्रात येतात मात्र निरीक्षक पुन्हा-पुन्हा प्रदक्षिणा घालून वळणावळणावर भेटतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला तरी पोलीस-पत्रकार एकाच गाडीची दोन चाके असल्याने जुळवूनच घ्यावे लागते. तसे वाद घालणे स्वभाव नसल्याने ते आपसूकच जुळते.
तिसऱ्या वर्गातील पहिले अधिकारी
पोलीस प्रशासनात अधिकारी ३ प्रकारचे असतात. एक काम काढून घेणारे, दुसरे कामाशी काम ठेवणारे, तिसरे कौटुंबिक नाते जोडणारे. पहिले आणि दुसरे खूप भेटतात मात्र तिसरे मनावर राज्य करतात. जळगाव एलसीबी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले किसनराव नजन-पाटील हे तेच. जळगाव जिल्ह्यात अनेक वर्ष सेवा बजावतांना शिस्तीसोबत त्यांनी संबंध देखील जोपासले. कर्तव्यात चूक न करता पत्रकार, राजकारणी यांच्याशी कसे जुळवून घ्यायचं हे त्यांना १०० टक्के जमले. लोकशाहीच्या स्तंभांशी आणि पुढाऱ्यांशी जुळवून घेणाऱ्याचे सर्वच चांगले होते, ही किमया त्यांनी साधली.
कर्णासारखं उदार मन, गुप्त मदतीचे बादशाह
पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांचं मन कर्णासारखं उदार आहे. आपल्या पोलीस दलाच्या सेवेत त्यांनी अनेकांना गुप्त पद्धतीने मदत केली आहे. चोपडा येथे सुरू असलेली मदत जळगावपर्यंत त्यांनी कायम ठेवली. अनेकदा तर कुणी मदत मागितली तर पाकिटात असलेली सर्व रक्कम देत केवळ दूध पिशवी घेण्यापुरते पैसे ते स्वतःजवळ ठेवत होते. साहेबांच्या दरबारी आलेला कदाचित कुणी असेल जो रिकाम्या हाती परतला असेल. सेवानिवृत्तीच्या एक दिवस अगोदर देखील एकाला ११०० रुपयांची देणगी त्यांनी दिली. पोलीस अधिकारी पदावर असताना देखील दातृत्व करायला मोठे मन लागते हे साहेबांनी कार्यातून दाखवून दिले.
मित्र, सल्लागार आणि मार्गदर्शक
पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना किसनराव नजन-पाटील साहेबांनी पत्रकार म्हणून एक मैत्रीचे नाते उत्कृष्ट निभावले. माझ्यापेक्षा जेष्ठ पत्रकार असताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही उलटपक्षी मला जास्तच महत्व दिले. किसनराव नजन-पाटील माझ्या वडिलांच्या वयाचे असल्याने अनेकदा त्यांनी माझ्या आयुष्यात सल्लागाराची भुमिका निभावली. मी लहान असतानाही बऱ्याचदा त्यांनी पत्रकार म्हणून माझा सल्ला देखील जाणून घेतला. मला जेव्हा-जेव्हा मार्गदर्शकाची गरज भासली तेव्हा त्यांनी मार्गदर्शन देखील केले. भविष्यात देखील मार्गदर्शन करत राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमच्याकडून आगळावेगळा निरोप
कर्मचाऱ्यांशी मैत्रीचे संबंध असतातच पण अधिकाऱ्यांची जवळीक झाली तर अनेकांच्या पोटात दुखू लागते. किसनराव नजन-पाटील साहेब आणि आमच्याबाबतीत तसेच झाले. एका पत्रकाराने पोलीस अधिकाऱ्याबद्दल इतकं सकारात्मक लिहिणे अनेकांच्या पचनी पडणार नाही मात्र सत्य कुणीही नाकारू शकत नाही. जळगावात साहेबांच्या कारकिर्दीच्या आठवणी गोळा करुन एक छानशी कौटुंबिक फोटोफ्रेम आम्ही साहेबांना भेट दिली. किसनराव नजन-पाटील हे बाप माणूस होते, आहे आणि राहणार कारण, माणसाचा स्वभाव सहजासहजी नाही बदलत. पुढील दीर्घायु आयुष्य आणि नवीन वाटचालीसाठी साहेबांना मनस्वी शुभेच्छा.