जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे चार आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत !
कुणाची वर्णी लागते याकडे लागले जिल्हावासियांचे लक्ष!
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून आले असून यात भाजपचे पाच शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक आमदार असे एकूण 11 आमदार निवडून आले आहेत.
भाजपचे संकटमोचक मंत्री म्हणून म्हटले जाणारे ज्येष्ठ नेते व सातव्यांदा निवडणूक जिंकणारे गिरीश भाऊ महाजन आणि शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले नेते गुलाबराव पाटील या दोन ज्येष्ठ नेत्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागेल यात कोणाचेच दुमत नाही.. तर दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार अनिल पाटील यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळते का?की मंत्रीपदाच्या विस्तारानंतर मिळेल याबाबत राजकीय वर्तुळात तरी सध्या चर्चा दिसून येत आहे. एकीकडे प्रत्येक वेळी हजारोंचे मताधिक्य वाढवत हॅट्रिक साधणारे जळगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजूमामा भोळे यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात राज्य मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण जळगाव शहराचा विकास जोमाने होण्यासाठी स्थानिक आमदार मंत्री झाल्यास त्याचा फायदा जळगावकर यांना होणार आहे. तर पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील तिसऱ्यांदा निवडून येत पाचोरा भडगावकरांची मने जिंकली आहेत. त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे आणि आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी या कामगिरीवर पाचोरा भडगावकरांनी त्यांना पुन्हा निवडून दिलेले आहे त्यामुळे शिवसेनेच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.
भुसावळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे यांनी चौकार मारीत चार वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची किमया साधली आहे. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून विजयी झाले होते. त्यावेळेस त्यांना राज्यमंत्रीपद ही बहाल करण्यात आले होते. मात्र आता ते भाजपवासी झाल्याने तीन वेळा भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले असून त्यांचीही पक्षनिष्ठा पाहता त्यांना एखादे राज्यमंत्रीपद मिळते का याकडे भुसावळ वासियांचे लक्ष आहे. तर चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे भाजप मधील जिल्ह्यातील चर्चेत राहणारा चेहरा म्हणून आक्रमक डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ते तरुण तडफदार नेतृत्व असल्यामुळे चाळीसगाव तालुक्याचा विकास झपाट्याने होण्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळावे अशी सूप्त मागणी चाळीसगाव वासियांमधून होत आहे.. आमदार मंगेश चव्हाण हे भाजपचे जेष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे मंगेश चव्हाण यांची देखील वर्णी मंत्री मंडळ विस्तारामध्ये लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्या रूपाने जेष्ठ मंत्री असल्यावरही वरील चार एकनिष्ठ असलेल्या आमदारांपैकी कुणाची राज्यमंत्रीपदी वर्णी लागते याची उत्सुकता जिल्हावासियांना लागून आहे.