
सातपुड्यात ‘पुष्पा स्टाईल’ने सागवानी तांडव; १५० हून अधिक वृक्षतोड, वन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
चोपडा प्रतिनिधी :सातपुडा पर्वतरांगातील हिरवाईला काही माफिया ‘पुष्पा स्टाईल’ने उद्ध्वस्त करण्याचे धक्कादायक प्रकरण चोपड्यात उघडकीस आले आहे. उमरटी येथील गोऱ्यापाडा परिसरात तब्बल १५० पेक्षा अधिक सागवानी वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचा गंभीर आरोप संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी केला आहे.
३१ ऑगस्ट रोजी दुपारी भरदिवसा ट्रॅक्टरमधून सागवानी दांड्यांची उघडपणे वाहतूक होत असल्याचा थरारक प्रकार पावरा यांनी माध्यमांसमोर मांडला. यामध्ये स्थानिक वनरक्षकांचा ‘आशीर्वाद’ असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगत जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ पुरावे सादर केले.
फिर्याद देण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात यांची भेट घेतली असता, “मी कोण आहे हे तुला माहीत आहे, पद सोडेन पण तुला दाखवतोच” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप पावरा यांनी केला असून त्याचा व्हिडिओदेखील माध्यमांमध्ये उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात वृक्षतोडीच्या आकड्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. थोरात यांच्या मते फक्त २१ झाडे तोडली गेली असल्याचे सांगितले जात असताना, प्रशांत सोनवणे यांनी २७ झाडांची कत्तल झाल्याचा दावा केला आहे. मात्र पावरा यांच्या म्हणण्यानुसार १५० पेक्षा अधिक वृक्ष नामशेष झाले असून, वन विभाग आकडे दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, “सातपुडा संपत आहे, ते ही वनविभागाच्या आशीर्वादाने” अशी चर्चा गावागावांत रंगली आहे. सुनील पावरा यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे.
सातपुड्याच्या हिरवाईला धोका निर्माण करणाऱ्या या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची गंभीर भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.






