महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ३ मयत, ४ जखमी
महा पोलीस न्यूज | १५ मार्च २०२४ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक भीषण अपघात घडला आहे महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वर जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. वाळूने भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. मंदिरात महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा करायचे नियोजन असल्याने शुक्रवारी ७ नागरिक ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जात होते. सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्व निघाले होते. बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रालाने क्रुझरला धडक दिली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तुषार जाधव वय – २५, रा. खोटे नगर, मूळ गाव धोबी वराड, विजय हिंमतराव चौधरी वय – ४२ रा.साई नगर, भूषण सुभाष खंबायत वय – ४५ रा.साईनगर यांचा अपघातात मृत्यू झाला असून ४ भाविक जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी क्रेन मागवून क्रूझर बाजूला करण्यात आली.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने पाळधी पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे.