महामार्गावर भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याच्या डोळ्याला दुखापत

महा पोलीस न्यूज । दि.२४ जून २०२५ । जळगाव शहराकडून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका ट्रक चालकाचा दबला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पासिंगचा ट्रक क्रमांक ओडी.१५.सी.२९६३ आणि आरजे.१४.जीटी.०४२१ यांच्यात ही धडक झाली. अपघाताची भीषणता इतकी होती की, एका ट्रकचा चालक केबिनमध्ये पूर्णपणे अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. अखेर, दोरीच्या साहाय्याने केबिन ओढून चालकाला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या चालकाला देखील दुखापत झाली असून त्याच्या एक डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा सुरू केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.