
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल वरुण येथे दि.२३ जून रोजी रात्री १५ ते २० अज्ञात व्यक्तींनी बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर चाकू आणि बाटल्यांनी हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यातील मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी सकाळी घटनेचा निषेध करण्यासाठी मद्य विक्री आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय मद्य असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.
सोमवारी रात्री साकेगाव पुढील हॉटेल वरुण येथे बिलाच्या वादातून अज्ञात ग्राहकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी कर्मचाऱ्यांना चाकूने जखमी करण्यात आले तसेच बाटल्या फोडून हल्ला करण्यात आला. जखमींना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यात वाढल्या हल्ल्याच्या घटना
जळगाव जिल्ह्यात अशा घटना गेल्या काही वर्षांपासून वारंवार घडत आहेत. मद्यविक्री व्यवसाय करणाऱ्यांना गुन्हेगार आणि गुंडांकडून त्रास दिला जात असताना देखील प्रशासनाकडून पुरेशी साथ मिळत नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, गुन्हेगारांना आळा घालणे कठीण झाले आहे. या घटनेने स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद
जिल्हा मद्य विक्री असोसिएशनची उद्या दि.२५ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सिल्वर पॅलेस येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. भुसावळ येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील मद्य विक्री करणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.