
मनोज चौधरी भाजपमध्ये; जळगावच्या राजकारणात पुनरागमनामुळे उत्साह
दहा वर्षांनी राजकारणात सक्रिय, भाजपची ताकद वाढणार
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांनी तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.
दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेल्या मनोज चौधरी यांची ओळख लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते अशी आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांची लोकप्रियता चांगली आहे. या लोकप्रियतेचा फायदा भाजपला निवडणुकीत निश्चितच होईल, अशी आशा भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर चौधरी राजकारणापासून काही काळ दूर होते, मात्र ते सध्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.
हा पक्षप्रवेश सोहळा ब्राह्मण संघ सभागृहात पार पडला. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.