मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरट्यास नाशिकमधून ठोकल्या बेड्या, दोन मोटारसायकल जप्त

मेहुणबारे (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. दरेगाव आणि वरखेडे परिसरातून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या प्रकरणी मालेगाव येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरेगाव व वरखेडे परिसरातून भरदिवसा दोन मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्र. ०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दत्त्रे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. यामध्ये दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
दोन दुचाकी हस्तगत, साथीदारांचा शोध सुरू
पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. अटकेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, या चोरीत त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार सामील असल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या या फरार साथीदारांचा शोध घेत असून, त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई
ही यशस्वी कामगिरी सपोनि प्रवीण दत्त्रे, पीएसआय सुहास आव्हाड, पीएसआय विकास शिरोळे, पोलीस कर्मचारी मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, मिलिंद कुमावत, विनोद बेलदार, राकेश काळे आणि प्रशांत खैरे यांच्या पथकाने केली आहे.





