Crime

खळबळजनक ‌‌: पोलिस निरीक्षकाच्या धमकीनंतर हवालदार बेपत्ता, पत्नीचा आत्महत्येचा इशारा

खळबळजनक ‌‌: पोलिस निरीक्षकाच्या धमकीनंतर हवालदार बेपत्ता, पत्नीचा आत्महत्येचा इशारा

इंदापूर (प्रतिनिधी) – इंदापूर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस निरीक्षकाकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत एका पोलिस हवालदाराने बेपत्ता होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, हवालदाराच्या पत्नीने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

बेपत्ता झालेल्या हवालदाराचे नाव विष्णू सुभाष केमदारणे (वय ३९) असून ते सध्या इंदापूर पोलिस ठाणे वसाहतीत राहत होते. त्यांच्या मूळ गावाचे नाव कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर असे आहे. त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी मंगळवारी (दि. १०) इंदापूर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

प्रियंका यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ९) रात्री १०.३० च्या सुमारास ते सकाळी ७ वाजेपर्यंत पती घरी परतले नाहीत. सकाळी त्यांनी सर्वत्र चौकशी केल्यानंतर एक मोबाइलवर ध्वनी संदेश (voice recording) व एक हाताने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. ही चिठ्ठी घरातील ड्रॉवरमध्ये सापडली. त्यामध्ये पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, विनोद रासकर आणि सूर्यवंशी यांच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना विचारणा केली असता त्यांनी, “वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतरच यावर भाष्य करू,” अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, प्रियंका केमदारणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्या पतीला न्याय न मिळाल्यास, मी माझ्या मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करीन,” असा इशारा दिला आहे.

या प्रकरणाने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून, हवालदाराचा शोध आणि आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button