मुक्ताईनगरमध्ये रस्त्यावर कचऱ्याचा ढीग ; नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र संताजी नगर कमानजवळ पाहायला मिळाले. भुसावळ रोडवर तहसील कॉर्नरलगत भर रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पडलेला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सकाळ पासून अद्यापही नगरपंचायतीची घंटागाडी या परिसरात आली नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “दररोजच या ठिकाणी कचरा टाकला जातो का? नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही का?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करूनही मुक्ताईनगरात प्रत्यक्षात अस्वच्छतेची स्थिती कायम असल्याची टीका होत आहे. तातडीने कचरा उचलून रस्ते स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, नगरपंचायत प्रशासनाने जागे होऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






