मुक्ताईनगर तालुक्यात सात हजार हेक्टर शेतीचे नुकसान

मुक्ताईनगर तालुक्यात सात हजार हेक्टर शेतीचे नुकसान
तालुक्यातील ३५ गावे बाधित
मुक्ताईनगर प्रतिनिधी ;- मुक्ताईनगर तालुक्यात सोमवार पासुन सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दमदार सुरुवात झाली. विशेषतः कुऱ्हा भागात पावसाचे थैमान पाहायला मिळाले. डोंगराळ भागात सलग पावसामुळे परिसरातील नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागले. यामुळे गावागावांत पाण्याचा वेढा निर्माण होऊन नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींना सामोरे जावे लागले.
या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मोठी हानी झाली आहे. केळी पिकांचे व सोयाबीन, कापूस, मका या खरीप पिकांचे पाणी साचल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी पिके अक्षरशः पाण्यात बुडाल्याने उत्पन्नाचा प्रश्नचिन्हांकित झाला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने केलेली मशागत व औषध फवारणी वाया गेल्याने आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळे मंगळवारी कुन्हा काकोडा भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पावसामुळे जोंधणखेडा येथीलधरण सुद्धा ओसांडून वाहत होते. मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडून माहिती घेतली असता प्राथमिक अहवालानुसार सात हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून ३५ गावे बाधित झालेली असल्याची
सांगितले. तसेच त्यांनी मंगळवारी पाहणी करून पंचनामेचे आदेश दिलेले आहेत.
महसुल मंडळ निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी खालील प्रमाणे मुक्ताईनगर ५९. ०९ मी. मी अंतुर्ली ७५. ०५ मी. मी कुऱ्हा – १४५. ४ मी. मी घोडसगावं – ६१. ९ मी. मी दिली आहे. पावसामुळे झालेल्या शेती पिकांसह, शेती साहित्य, घरे व दुकाने यामध्ये पाणी शिरले होते. संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या असून पंचनामे सुरू आहेत. लवकरच योग्य ती मदत नुकसानग्रस्तांना केली जाईल.






