बेलासवाडी ग्रामपंचायत बदनामीचा कट उधळला; तक्रारीवरील महिलांच्या सह्या निघाल्या बनावट!

मुक्ताईनगर (सुभाष धाडे): मुक्ताईनगर तालुक्यातील बेलासवाडी येथील ग्रामपंचायत प्रशासनाला जाणीवपूर्वक लक्ष्य करून बदनाम करण्याचा डाव अखेर उधळला गेला आहे. गावातील महिलांच्या बनावट सह्यांचा आधार घेऊन करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे खुद्द त्याच महिलांनी प्रत्यक्ष हजर राहून गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
ऑक्टोबर २०२५ मध्ये बेलासवाडी येथील वंदना कोळी व इतर महिलांच्या नावे पंचायत समितीमध्ये एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात ग्रामपंचायतीच्या कारभारावर ठपका ठेवत सरपंच व सदस्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या अर्जाची दखल घेत प्रशासनाने जानेवारी २०२६ मध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चिती संदर्भात पत्रही काढले होते.
महिलांनी उघड केला बनावटगिरीचा प्रकार:
मात्र, या प्रकरणात आज एक मोठी कलाटणी मिळाली. ज्या महिलांच्या नावाचा वापर करून तक्रार करण्यात आली होती, त्या महिलांनी आज स्वतः मुक्ताईनगर पंचायत समिती गाठली. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, “मूळ अर्जावर असलेल्या सह्या आमच्या नाहीत. आम्ही ग्रामपंचायतीविरुद्ध कोणतीही तक्रार केलेली नाही. कोणीतरी खोटी तक्रार करून आमचा वापर केला आहे.”
दोषींवर कारवाईची मागणी:
* महिलांनी दिलेल्या निवेदनात संबंधित ग्रामपंचायतीबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
* जुना तक्रार अर्ज तातडीने निकाली काढण्याची विनंती करण्यात आली आहे.
* शासनाची दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट सह्या करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही महिलांनी केली आहे.
आज निवेदन देतेवेळी बेलासवाडी येथील असंख्य महिला उपस्थित होत्या. या प्रकारामुळे गावात खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.






