ग्रामपंचायत सदस्याजवळ गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ

ग्रामपंचायत सदस्याजवळ गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव: मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील एका ग्रामपंचायत सदस्याला गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे.
संशयित अर्जुन जनार्दन सांगळकर (वय ३०, रा. घोडसगाव) याला मुक्ताईनगर-घोडसगाव रस्त्यावरील माकरणी हॉटेलजवळील प्रेमप्रतीक टी सेंटर परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या पथकात प्रितम पाटील, श्रीकृष्ण पाटील, रवींद्र चौधरी आणि रवींद्र कापडणे यांचा समावेश होता
. संशयित अर्जुन सांगळकर याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे २० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. या कारवाईनंतर एलसीबीचे कर्मचारी रवींद्र कापडणे यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अर्जुनविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करत आहेत.ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय बनली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्परतेमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.