महा पोलीस न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | पाचोरा तालुक्यातील अंतूर्ली खुर्द या गावात २७ वर्षीय जुबेर खान या तरुणावर प्राणघातक हल्ला करून संशयीत आरोपी फरार झाले होते. उपचार सुरू असताना जुबरचा दि.१६ रात्री मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भुमिका मनियार बिरादरी आणि नातेवाईकांनी घेतली होती. पोलीस अधीक्षकांनी संशयितांना ४८ तासाच्या आत अटक करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईक माघारी परतले होते.
जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, वहिदत इस्लामीचे अध्यक्ष अतिक अहमद, सामाजिक कार्यकर्ते अनिस शहा व त्यांच्यासह अंतुर्ली येथील गावकरी सर्वश्री अल्ताफ पठाण, शाहरुख खान, मोईन अली, इमरान अली, मोहसीन अली, वसीम अली, रियाज अली व जमील बेग यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना त्वरित अटक करा व पोलिसांनी गंभीर स्वरूपाची हेड इंजुरी असताना सुद्धा भा.दं.वि.३०७ प्रमाणे गुन्हा का दाखल केला नाही? याची चौकशी करा अशी मागणी केली होती. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आरोपींना ४८ तासाच्या आत अटक करण्यात येईल व जर पोलिसांचा काही निष्काळजीपणा असल्यास त्याबाबत सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याने तो मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता.
शनिवारी रात्रीच पोलिसांनी चारही संशयीत आरोपींना निष्पन्न करून त्यांना अटक केली व रविवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक केलेल्या संशयीत आरोपीमध्ये प्रमुख नाना अभिमान पाटील व राहुल नाना पाटील असे दोघे असून त्यांना सहकार्य करणारे सतीश विष्णू पाटील व शेख मुनाफ पटवे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षकांनी ४८ तासाचा अवधी मागितला असला तरी चौघांना २४ तासाच्या आत अटक केली त्याबद्दल जिल्हा मनीयार बिरादरीतर्फे फारुक शेख व कूल जमातीतर्फे सैयद चांद यांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले आहे.