Politics

जळगाव जिल्ह्याला लागली तीन मंत्री पदाची लॉटरी,

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील , संजय सावकारे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

जळगाव / नागपूर प्रतिनिधी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर येथे रविवारी पार पडला असून महायुतीच्या 39 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा तीन कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली असून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील आणि भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या रूपाने तीन जणांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. अद्याप या तीनही मंत्र्यांना खातेवाटप झाले नसून त्यांच्या खाते वाटपाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

 

जामनेर विधानसभा मतदारसंघातून सातव्यांदा विजयी झालेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. तसेच ते भाजपचे संकट मोचक मंत्री सुद्धा ओळखले जातात. गिरीश महाजन यांनी या अगोदर जलसंपदा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नाशिकचे पालकमंत्री यास अन्य खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या कारभार पाहिला आहे. त्यांना आणखी एखादे महत्त्वाचे जबाबदारीचे खाते मिळेल असे राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.

दुसरीकडे शिवसेना नेते व खानदेश मुलुख मैदान तोफ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील यांना देखील पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली असून ते या अगोदर पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे. त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून कोणते खाते मिळते हे अद्याप कळले नसले तरी त्यांना एखादे जबाबदारीचे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.

भुसावळचे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय सावकारे यांची भाजपने कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली असल्याने त्यांच्या रूपाने भुसावळ शहरासह जळगाव जिल्हाचा विकास मार्गी लागेल. दरम्यान पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक असे तीन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याला मिळाले आहेत.

राष्ट्रवादीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल पाटील यांचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नसला तरी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच जळगाव शहरातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार राजू मामा भोळे यांनी हॅट्रिक साधली असून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना राज्य मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button