
अमळनेर | प्रतिनिधी | – तालुक्यातील मौजे डांगर बु या गावाने आता एक नवीन ओळख मिळवली आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर ‘उदयनगर’ हे नाव राज्य शासनाच्या राजपत्रात अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी गेली सहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करून अखेर हे स्वप्न सत्यात उतरवले.
गावाचे नामांतर ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नव्हती, तर गावकऱ्यांची भावना आणि स्वाभिमान यांचा अविभाज्य भाग होती. गृह विभाग, दिल्ली यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या वतीने दिनांक २७ मे २०२५ रोजी ‘उदयनगर’ नामकरणाचा राजपत्र प्रसिद्ध करण्यात आला.
या ऐतिहासिक घडामोडीनंतर गावकऱ्यांमध्ये आनंदाची भावना असून, सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. नागरिकांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे पुष्पगुच्छ, मिठाई व ढोल तासे वाजवत घोषणांनी जोरदार स्वागत करत त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले, “गावाच्या ओळखीला नवा अर्थ देण्यासाठी मी हे नामकरण प्रकरण धीराने आणि चिकाटीने पूर्णत्वास नेले. ‘उदयनगर’ हे नाव आता गावाच्या वैभवाची नवी सुरूवात ठरेल.”गावाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडणाऱ्या या निर्णयामुळे ‘उदयनगर’ हे नाव भविष्यात एक प्रगतीशील आणि प्रेरणादायी ओळख ठरेल, यात शंका नाही.