Politics

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा भव्य मेळावा उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा भव्य मेळावा उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी :-या भूमीतील भूमिपुत्र म्हणून मला कार्यकर्त्यांनी दोन वेळा आमदारकीची संधी दिली,स्मिताताईना देखील खासदार केले,यासाठी कार्यकर्ते एकसंघ होऊन लढले मात्र आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना आम्ही भांडत न बसता एकदिलाने सोबत राहून काम करू आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ,जेणे करून अमळनेर येथील महायुतीचा हाच पॅटर्न जिल्ह्यात राबविला जाईल अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडी पुरस्कृत भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील कलागुरु मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.या मेळाव्यात माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनीही उपस्थिती देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.मेळाव्यास शहर व ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती.या मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की, “या निवडणुका महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार लढविण्यात येणार असून,इतर पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न राहील. जनतेच्या मनात असणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य दिलं जाणार आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की, उमेदवार निवड प्रक्रियेसाठी विशेष समिती(कोअर कमिटी) गठीत करून जनतेच्या मनातील आणि लोकाभिमुख उमेदवारालाच तिकीट दिलं जाईल.तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारणात 30 ते 32 वर्षात अनेक उतार चढाव मी बघितले,पण त्याचे साथीदार व साक्षीदार तुम्ही कार्यकर्ते आहेत,सामान्य कुटुंबातील मी असताना तुम्ही साथ सोडली नाही,त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठीच हा मेळावा आहे.खासदार स्मिताताई तसेच शिवसेना व महायुती च्या नेत्यांशीही पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे,यापुढे महायुती चा मेळावा आपण कदाचित घेऊ.
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे पण पण फक्त निवेदन व आंदोलन करून निधी मिळत नाही,पीडित शेतकरी बांधवाना मदत द्या अशी विनंती मी स्वतः उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्याकडे केली आहे,येणाऱ्या कॅबिनेट मध्ये दिवाळी नंतर झालेल्या अतिवृष्टीबाबत मदतीचा निर्णय व्हावा अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे अमळनेर वर प्रेम आहे म्हणूनच अमळनेर शहर विकास आघाडी नावाने निवडणूक लढवतो,नाहीतर आमदार अनिल पाटील आघाडी नाव टाकलं असत असे सांगत ही आघाडी माझी नसुन अमळनेर मधील प्रत्येकाची असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.तसेच पुढे ते म्हणाले की,“तब्बल नऊ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याला कुठे ना कुठे संधी मिळावी, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. भाजपसोबत चर्चा सुरू असून, योग्य चर्चेनंतर एकत्रित लढाई केली जाईल.” त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, “मला आणि साहेबराव पाटील यांना वेगळं करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण निवडणुकीच्या वेळी आम्ही एकत्र आलो की काहींचा घाम फुटतो!”

पुन्हा जातीयवादाला थारा नाहीच

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले की विधानसभा निवडणूक प्रमाणे हे लोक पुन्हा जातीयवाद आणतील, पण आता आपल्याला ते नको आहे,आपण दिलेला उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार त्याच्या पाठीशी राहा,चांगल्या कार्यकर्त्यासाठी थांबावे लागले तर नाराज होऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.

नंदुरबारकडे विशेष लक्ष :

आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं की, “या वेळी माझं विशेष लक्ष नंदुरबारकडे असणार आहे. मी अपघाताने नव्हे, तर जनतेच्या विश्वासाने ३० वर्षांपासून राजकारणात आहे. काही जण पाच वर्ष अपघाताने आमदार झाले आणि ते स्वतःला नेते समजू लागले,” असा टोला त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरींना लगावला.

बिनविरोध निवडणूक होणे शक्य

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले की “अमळनेरची जनता उदार आहे. मी अपक्ष निवडून आलो आणि माझ्या पत्नीला नगराध्यक्षा बनवले. अनिलदादांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मीच प्रयत्न केले. आम्ही दोघं एकत्र आलो तर अमळनेरमध्ये बिनविरोध निवडणूक होणं अशक्य नाही.”त्यांनी पुढे सुचवलं की, सर्वानाच सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न व्हावा.”
यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,इम्रान खाटिक, माजी जिल्हा परिषद सदस्य हिमत पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील आणि माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, भारती चौधरी, विनोदभय्या पाटील, नाना रतन चौधरी,सभापती अशोक पाटील, जितेंद्र झाबक, प्रभाकर पाटील, अशोक आधार पाटील, तिलोत्तमा पाटील, डॉ. अशोक पाटील, बिरजू लांबोळे, गिरीश पाटील, प्रवीण साहेबराव पाटील,सत्तार मास्तर,प्रकाश वाघ,जबीर पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले आणि आभार जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मानले.
या मेळाव्यास तालुका व शहरातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button