एकनाथराव खडसेंची घरवापसी, ‘या’ दिवशी होणार प्रवेश!
महा पोलीस न्यूज | ६ एप्रिल २०२४ | भारतीय जनता पक्षासाठी ३० पेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेले आणि ४ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले आ.एकनाथराव खडसे पुन्हा घरवापसी करणार आहेत. स्वतः एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. खडसेंच्या घरवापसीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट ढवळून निघणार आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये ३० पेक्षा अधिक वर्ष कार्यरत राहून तळागाळात पक्ष पोहोचवण्याचे कार्य करणारे नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे गेल्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले. मुख्यमंत्रीपदी खडसेंची वर्णी लागली नाही मात्र त्यांच्याकडे डझनभर खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जमत नसल्याने दोघांमधील वाद अधिकच ताणला गेला. त्यातच खडसेंच्या मागे भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागला. खडसेंना ईडीची नोटीस आली, जावयांना अटक झाली, जळगाव जिल्हा दूध संघातील व्यवहारांची चौकशी सुरू झाली, अशा एका मागे एक अडचणी येऊ लागल्या.
भाजपसोबत आणि नेत्यांसोबत जमणार नसल्याचे लक्षात घेत २०२० मध्ये एकनाथराव खडसेंनी भाजपला राम राम ठोकला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या. त्यातच त्यांच्या प्रकृतीचा त्रासही वाढला. मुक्ताईनगर येथील गौण खनिज उत्खन प्रकरणी त्यांना शेकडो कोटींची नोटीस आली. या सर्व घडामोडी सुरू असताना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी निवडणूक लढवणार असल्याचे खडसेंनी जाहीर केले होते.
एकनाथराव खडसेंनी दिली माहिती
एकनाथराव खडसेंच्या भरवशावर असलेल्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला नाही. भाजपच्या रक्षा खडसे प्रचाराला लागल्या आणि खडसेंनी युटर्न घेतला. प्रकृतीचे कारण देत त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर एकनाथराव खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. चार दिवसापूर्वी खडसे दिल्लीत गेले आणि चर्चांना अधिक ऊत आला. अखेर शनिवारी काही माध्यमांशी बोलताना मी भाजपात प्रवेश करणार असल्याचे एकनाथराव खडसेंनी स्पष्टपणे सांगितले.
‘हा’ असणार प्रवेशाचा मुहूर्त
एकनाथराव खडसे यांनी आपण भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती दिली असली तरी अद्याप प्रवेशाची तारीख ठरलेली नाही. दरम्यान, एकनाथराव खडसे हे दि.९ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर किंवा अर्ज माघारीच्या अगोदर जिल्ह्यात भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या सभेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथराव खडसे यांच्यासोबत काही माजी आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.