बोळे येथील निमदाळे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; गावात हळहळ

बोळे येथील निमदाळे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; गावात हळहळ
पारोळा, : पारोळा तालुक्यातील बोळे गावाजवळील निमदाळे धरणात बुडून सोनल रवींद्र पाटील (वय २०, रा. बोळे) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
सोनल पाटील हा धरणाजवळ फिरण्यासाठी गेला असताना अचानक पाय घसरून खोल पाण्यात पडला. त्यावेळी धरण परिसरात उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत सोनल बेशुद्ध अवस्थेत होता.
त्याला तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे बोळे गावात शोककळा पसरली आहे. एक होतकरू तरुण अकल्पित मृत्यूमुखी पडल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी भाऊसाहेब पाटील यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर सोनवणे करीत आहेत.